मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी मुलूंड कोर्टाने दत्ता दळवी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली असून गेल्या 2 दिवसांपासून ठाणे कारागृहात असलेले दळवी आज मुक्त होणार आहेत. दरम्यान, कोणत्याही समाज आणि समूहा विरोधात, दत्ता दळवी यांनी अवमानकारक वक्तव्य केलं नसल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं असून 5 अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.(Datta Dalavi)
41A ची नोटिस न देता दळवी यांना अटक
दरम्यान, दत्त दळवी यांना अटक केल्यानंतर त्यांच्या वकिलांनी 41A ची नोटिस न देता त्यांना अटक केल्याचा दावा केला होता. त्यांच्या दाव्याची कोर्टानं नोंद घेतली आहे. तसेच पोलीसांनी सेक्शन 153 गैरलागू केल्याचाही दावा दळवी यांच्या वकिलांनी केला होता, याच दाव्यावर उद्देशून स्टेजवर हे मान्य होऊ शकत नसल्याचं निरिक्षण कोर्टानं नोंदवलं आहे.
तसेच, चंदा कोचर केसचा रेफरन्स देखील दळवी यांच्या वकिलांनी कोर्टात दिला होता. आरोपी दत्ता दळवी यांचं वय आणि मेडिकल हिस्ट्रीही कोर्टानं लक्षात घेता दळवींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, काही अटी आणि शर्ती पाळण दळवींना बंधनकारक केलं आहे.
‘या’ आहेत अटी आणि शर्ती
- प्रकरणाचा तपास संपण्यापर्यंत काही प्रतिबंध लागू.
- मुख्यमत्र्यांविरोधात कोणतेही अवमानकारक वक्तव्य करण्यास मनाई.
- कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभक वक्तव्य करण्यास मनाई.
- पोलिसांना सहकार्य करणे बंधनकारक.
- कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये, याची काळजी घेणं बंधनकारक.
काय आहे नेमकं प्रकरण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भर सभेतून शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली दळवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी (२७ नोव्हेंबर) भांडुपमधील ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहिर मेळावा आयोजित केला होता.
या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या ‘हिंदुह्रदयसम्राट’ या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी जोरदार टीका केली होती. यावरून शिंदे गटाचे नेते तसेच कार्यकर्ते आक्रमक झाले होते. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं, असा आरोप करत शिंदे गटाने भांडूप पोलिसांत तक्रार दाखल केली होती. (CM Eknath Shinde)