मुंबई : भाईंदर रेल्वे स्थानकावर वडील आणि मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत. ही घटना सोमवारी (ता.08) सकाळी घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. वडिल हरीश मेहता (वय-60) आणि मुलगा जय मेहता (वय-35) असे मृत व्यक्तींची नावे आहेत.
या घटनेसंदर्भात मिळालेली माहिती अशी की, सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालेल्या या घटनेत वडील आणि मुलगा प्लॅटफॉर्मवर एकमेकांशी बोलत विरारच्या दिशेने जाताना दिसत आहेत. प्लॅटफॉर्मवरुन उतरुन काही अंतर गेल्यावर दोघे पिता-पुत्रांनी विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणा-या लोकल ट्रेनसमोर आडवे झाले. या व्हायरल व्हिडिओमध्ये वडील आणि मुलगा रेल्वेच्या रुळावर झोपलेले स्पष्ट दिसत आहे. अचानक धावत्या लोकलसमोर आल्यामुळे लोकल चालकाने लोकल थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तितक्यात लोकल दोघांच्या अंगावरुन गेली. त्यात दोघांचा मृत्यू झाला.
या बाप लेकाने नेमकं कोणत्या कारणांमुळे आत्महत्या केली, हे मात्र अद्याप समजू शकले नाही. त्यांच्याकडे कोणतीही सुसाईड नोटदेखील आढळून आलेली नाही. या प्रकरणी वसई पोलीसांत नोंद झाली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे.