मुंबई : अंबरनाथच्या वडोळ गावात जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात मारण्यात आलेल्या चाकूची मूठ तुटल्याने चाकू तरुणाच्या पाठीत अडकला होता. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शस्त्रक्रियेनंतर पाठीत अडकलेला चाकू काढण्यात आला आहे. या तरुणाची प्रकृती स्थिर असल्याचं बोललं जात आहे. हि घटना सोमवारी रात्री अंबरनाथच्या वडोळ गावच्या सेंट जोसेफ शाळेजवळ ही घटना घडली. सौरभ म्हात्रे असं जखमी तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ म्हात्रे हा अंबरनाथच्या वडोळ गावात राहण्यास आहे. तो रात्री जेवणाचं पार्सल घरी घेऊन जात होता. त्यावेळी रोहन जाधव उर्फ वाघ्या याने सौरभला थांबवून कोरोना काळातील वाद उकरून काढला. कोरोना काळात आपला वाद झाला होता त्याबद्दल मला तुझ्याशी बोलायचं आहे. मात्र, मला घरी जायचं असून उशीर होत आहे असं सांगून सौरभ बाईकवर बसून जात होता. त्यावेळी रोहनने सौरभच्या पाठीत धारदार चाकू खुपसला.
आरोपी रोहनने पूर्ण ताकदीने चाकू हल्ला केला. मात्र, चाकूची मूठ तुटल्याने चाकू सौरभच्या पाठीतच अडकला. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पाल काढला. स्थानिकांनी सौरभला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर डॉक्टरांनी तातडीची शस्त्रक्रिया करून चाकू काढला. या हल्ल्यात सौरभ गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी रोहन उर्फ वाघ्या विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, तो फरार झाला असून अंबरनाथ पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सौरभची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.