मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता 24 तास आणि स्वस्तात वीज मिळणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना अवघ्या दोन रुपयांमध्ये वीज मिळेल. या योजनेचा सर्व घोषवारा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसांगितला आहे. त्याचबरोबर महावितरण ही नवरत्न कंपनी करण्याचा संकल्प ही त्यांनी बोलून दाखवला आहे.
राज्य सरकारने आतापर्यंत दीड लाख पंप दिले आहेत. परंतु, आता एकाच वर्षांमध्ये 8 लाख सोलर पंप मंजूर करुन निधीचा पुरवठा केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मागेल त्याला सोलर पंप देण्यात येणार आहेत. सध्या पाच लाख सोलरची मागणी असून राज्य सरकारकडे आठ लाख सोलर पंप उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांचे रात्रीचे वीजेचे संकट आम्ही संपवू असे वचन दिले होते. त्याप्रमाणे ते आम्ही पूर्ण करु. आगामी दीड वर्षात 50 टक्के शेतकऱ्यांचे हे संकट संपविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
तसेच शेतकऱ्यांना स्वस्तात वीज मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही वीज आता 24 तास उपलब्ध असेल. शेतकऱ्यांन 2 रुपये 87 पैसे ते 3 रुपये 10 पैशात वीज मिळणार आहे. त्यासाठी पूर्वी राज्य सरकारला साडेसात रुपयांचा खर्च येतो. हा खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. तसेच राज्यात विजेची पण बचत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी केवळ 11 महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. अजून 18 महिने उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी देण्यात आले आहे. एकूण कृषी फीडर पैकी 50 टक्के फिडर हे पुढच्या दीड वर्षांमध्ये सोलर होतील. 50% फीडर्सचे काम पूर्ण होताच, महाराष्ट्र पहिलं राज्य असेल की ज्यामध्ये 100% कृषी जी काही वीज निर्मिती आहे ही सोलरवर त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्म होईल आणि खर्चाची बचत होईल, असे फडणवीस म्हणाले.
सध्या सबसिडीवर राज्य सरकार 13000 कोटी रुपये खर्च करते. सौर पंपामुळे हा खर्च वाचेल. तर औद्योगिक वीजेचा दर पण काही प्रमाणात बदलता येणार आहे. सध्या जी ॲग्री सोलर कंपनी काढलेली आहे .त्याच्या आधारावर पुढील तीन ते चार वर्षांमध्ये महावितरण कंपनीला नवरत्न कंपनीमध्ये आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आतच्या या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. तर 25000 रोजगार निर्मिती होणार असल्याचे ऊर्जामंत्री फडणवीस यांनी सांगितले.