मुंबई : मराठी सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. आपल्या अभिनयाने सतत लोकांना हसवणारे हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. काही वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. तेव्हा त्यांचं वजन झपाट्याने कमी झालं होतं. त्यांची स्थिती कोणालाच पाहवत नव्हती.
तरी त्यांनी हिमतीने कॅन्सरवर मात केली आणि ते बरे देखील झाले. तब्येत सुधारल्यानंतर त्यांनी पुन्हा कामालाही सुरुवात केली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वीच त्यांना तब्येत बरी नसल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता त्यांच्या निधनाची बातमी आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे. एक हरहुन्नरी अभिनेता आपल्यातून हरपला आहे. नाटक, सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांवर अतुल परचुरे यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली होती.
मागील अनेक दिवसांपासून अतुल परचुरे हे कर्करोगाशी झुंजत होते. इतकच नव्हे तर त्यांनी कर्करोगावर मात करत रंगभूमीवरचा अंक सुरुच ठेवला होता. त्यांच्या या नव्या अंकाचं अनेकांनी भरभरुन कौतुक केलं होतं. इतकच नव्हे तर त्यांनी नुकतच सुर्याची पिल्ले या नाटकाचीही घोषणा केली होती. त्यामुळे अतुल परचुरे हे रंगभूमीवरुन पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासही सज्ज झाले होते.