मुंबई : मुख्यमंत्री सचिवालयातुन एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी स्वाक्षरी आणि शिक्के वापरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाकडून माहिती देण्यात आली. कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले आहे. यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे, असं मुख्यमंत्री सचिवालयाकडून सांगण्यात आलं आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद आणि बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. त्या कर्मचाऱ्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर या प्रकाराची मुख्यमंत्र्यांनीही गंभीर दखल घेतली आहे. तत्काळ यासंबंधी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री सचिवालयास नियमितपणे मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शेरे असणारी विविध निवेदनं आणि पत्र पुढील कार्यवाहीसाठी प्राप्त होत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन ती ई ऑफिस प्रणालीत नोंद केली जाते. तसेच संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवण्यात येतात. मात्र, बनावट सही आणि शिक्का मारल्याचे लक्षात आल्यानंतर सचिवालयाकडून मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावरून पोलीस अधिक तपास करीत आहेत.