पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. त्यांना जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विरोधकांनी या निर्णयावर टीका केली आहे. निवडणूक काळात फोन टॅप करण्यासाठी भाजप सरकारने हा निर्णय घेतल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी केलीय. रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पदावरील नियुक्तीपासून पुढे 2 वर्षे हा कालावधी असणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर हा शासन निर्णय पाहता येणार आहे.
फोन टॅपिंगचे आरोप झाल्यानंतर रश्मी शुल्का चर्चेत आल्या होत्या. मराठा आरक्षण पुरस्कर्ते मनोज जरांगे यांचा बोलविता धनी कोण आहे? हे पहावे लागेल, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महत्वाच्या भाजप नेत्यांनी केले होते. यावर बोलताना रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक असताना सरकारसाठी ते शोधणे सोपे आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
फोन टॅपिंग प्रकरण आहे तरी काय?
रश्मी शुक्ला यांचे नाव देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या अधिकारी म्हणून घेतले जाते. राज्य गुप्तचर विभागात आयुक्तपदावर असताना बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर विरोधकांकडून करण्यात आला होता. काँग्रेस नेते नाना पटोले यांचे फोन कॉल रेकॉर्ड केल्याप्रकरणी मुंबई आणि पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फडणवीस सरकार सत्तेत असताना आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर देखील बेकायदेशीर फोन टॅप केले जात होते. यानंतर भाजप सरकारला धारेवर धरण्यात आले होते.
या प्रकरणानंतर बीकेसी सायबर पोलिसांनी 26 मार्च 2021 रोजी अधिकृत गुपित कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आणि कॉल्स लीकची चौकशी सुरु केली. त्यावेळी मार्च 2022 मध्ये सायबर पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांचा देखील जबाब नोंदवला गेला. याप्रकरणी पोलिसांनी एकूण 24 जणांचे जबाब नोंदवण्यात आले होते. यानंतर सीबीआयने दंडाधिकार्यांसमोर क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. सध्याच्या माहितीनुसार रश्मी शुक्ला यांच्याविरोधातील मुंबई आणि पुण्यातील गुन्हे रद्द करण्यात आले आहेत.