मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री चौहन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. सोयाबीन खरेदीला किमान 15 दिवस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केंद्रीय कृषिमंत्री यांच्याकडे केली आहे. आता त्यांच्या या मागणीवर कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी
दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे पणन विभागाकडून १०० दिवसात करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला, यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणारे ॲग्रो हब, मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत उभे करावेत. या ठिकाणी सर्व सोयीसुविधा उभारण्यात याव्यात. या ॲग्रो हबसाठीचा आराखडा तयार करून सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. सोयाबीन खरेदीविषयी आजच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीन खरेदीला किमान 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे दूरध्वनीद्वारे केली आहे.
पुढील वर्षापासून राज्यात नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठीची तयारी ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. तसेच शेतकऱ्यांची नोंदणीही ऑक्टोबरमध्ये पूर्ण करावी. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी उभारण्यात येणाऱ्या व्यवस्थेचे निकष ठरवावे. त्यामध्ये सर्व सोयीसुविधांचा अंतर्भाव असावा.
कोणत्याही अडचणीशिवाय सोयाबीन खरेदी सुरू राहिली पाहिजे अशी यंत्रणा उभी करावी. राज्यातील चारही विभागात उभारण्यात येणाऱ्या ॲग्रो लॉजिस्टिक हबचा प्रस्ताव सादर करावा. कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ हा उत्तम पर्याय असून त्यासाठी जास्त मागणीही आहे. त्यामुळे कांदा चाळींची संख्या वाढवावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.