मुंबई : देशातील लोकसभा निवडणुकीचे मतदान आज शनिवारी संपले. यानंतर सर्वांना उत्सुकता असलेले एक्झिट पोलचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये टीव्ही 9- पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात महाविकास आघाडी मुसंडी मारण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. यापैकी 25 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार, तर 22 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. सांगलीतील एका जागेवर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचा विजय होण्याची शक्यता टीव्ही 9- पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवली आहे.
दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला राज्यातील 41 लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळाला होता. हा आकडा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 22 पर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे. हा महायुती आणि पर्यायाने भाजपसाठी मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे आता 4 जूनला प्रत्यक्ष निकालात हेच चित्र पाहायला मिळणार का? याकडे सर्वांचे लक्स लागून राहिले आहे.
टीव्ही ९-पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार, बारामतीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांचा विजय होईल. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बारामतीसह ते लढवत असलेल्या शिरूर, रायगड आणि उस्मानाबाद (धाराशिव) या चारही मतदारसंघांमध्ये पराभवाला सामोरे जावा लागेल. या एक्झिट पोलने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ६ जागांचा अंदाज वर्तवला असून अजित पवारांना एकही जागा मिळणार नसल्याचे म्हटले आहे.
एबीपी न्यूज-सी व्होटरचा एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात भाजपला १७, एकनाथ शिंदे यांची शिवसेनेला ६ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र ही १ जागा कोणती असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीतील काँग्रेस ८, शरद पवार यांची राष्ट्रवादी ६ आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ९ जागांवर जिंकू शकते. तसेच एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.