मुंबई : मुंबईमधून एक धकाकड्याक बातमी समोर आली आहे. आजारी पतीला बरं करून देण्याच्या नावाखाली एका महिलेवर भोंदूबाबाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या आरे पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. वारंवार धमक्या देऊन गेल्या साडेचार वर्षांपासून भोंदूबाबा महिलेवर बलात्कार करत होता. भोंदूबाबाने महिलेच्या अल्पवयीन मुलींसोबतही गैरवर्तन केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
राजाराम रामकुमार यादव असे अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. तो गेल्या साडेचार वर्षांपासून महिलेवर बलात्कार करत होता. महिलेने शरीरसंबंधास नकार दिल्यास संपूर्ण कुटुंबास मारून टाकण्याची धमकीही तो देत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरे पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेच्या पतीचा आजार बरा करून देण्याच्या नावाखाली भोंदू मांत्रिकाने महिलेवर वारंवार बलात्कार करून तिच्या दोन अल्पवयीन मुलींसोबतही गैर कृत्य केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेने आरे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्ल्यानंतर आरे पोलिसांनी गुन्हाचे गांभीर्य लक्षात घेऊन भोंदू बाबाला ताबोडतोब अटक केली.
पीडित महिला २०२० पासून आरे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या भागात भाड्याच्या घरात राहत आहे. याच काळात महिलेचा पती वारंवार आजारी पडू लागल्यामुळे महिलेने त्याच परिसरात राहणाऱ्या भोंदूबाबाशी संपर्क साधला. त्याने महिलेला विश्वासात घेऊन पतीचा आजार, काळी जादू आणि मंत्राने बरा करतो असे सांगितले. आजार बरा करण्यासाठी मांत्रिकाने महिलेच्या घरात काळी जादू आणि मत्र जप करण्यास सुरवात केली. काळी जादू केली असल्याने ती काढण्यासाठी शरीरसंबंध ठेवावे लागतील असे सांगून मांत्रिकाने महिलेवर अनेकदा बलात्कार केला. मात्र आजार काही बरा झाला नाही. मांत्रिकाच्या या कृत्याला महिला त्रासून गेली होती. मात्र पतीच्या उपचारासाठी ती इच्छा नसतानाही हे सर्व सहन करत राहिली.
दोन अल्पवयीन मुलींसोबतही केले गैरकृत्य..
दि. १४ जानेवारी रोजी रात्री दीड वाजता मांत्रिकाने महिलेच्या दोन अल्पवयीन मुलींना आरे कॉलनी जंगलात नेऊन त्यांच्या अंगावर लवंग फुले फिरवून गैरकृत्य केल्याचे समोर आले आहे. भोंदूबाबाच्या या कृत्याला महिलेने विरोध केला. तसेच महिलेने शरीरसंबंधास नकार दिल्यामुळे भोंदूबाबाने काळी जादू करून संपूर्ण कुटुंबाला मारून टाकण्याची धमकी दिली. यामुळे पीडित महिलेने भोंदूबाबा राजाराम यादवच्या विरोधात आरे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे.