मुंबई : जनतेचे रक्षणकर्तेच भक्षक बनले तर? अशीच एक महाराष्ट्राला हादरवणारी घटना मुंबई पोलीस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागातून उघडकीला आली आहे. मुंबई पोलीस दलातील आठ महिलांकडून पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्तांसह तीन अधिकाऱ्यांकडून बलात्कार होत असल्याचा गंभीर आरोप महिला पोलिसांनी केला आहे. या आठ महिला पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामुळे मुंबई पोलीस दलातील गंभीर बाब समोर आली असून, एकच खळबळ उडाली आहे. पत्राची गंभीर दखल घेऊन घटनेची सखोल चौकशी होणार आहे.
या महिला पोलिसांनी केलेल्या आरोपानंतर केलेल्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. शरिरसंबंधातून या महिला शिपायी गर्भवती राहिल्याने त्यांना जबरदस्तीने गर्भपात देखील करायला भाग पडण्यात आले. यासोबतच या अधिकाऱ्यांनी शरिरसंबंध ठेवतानाचे व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रार अर्जात केला आहे.
नागपाडामधील मुंबई पोलीस दलाच्या ट्रान्सफर डिपार्टमेंटमधील आठ महिला पोलिसांनी या गंभीर घटनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. एक पोलीस उपायुक्त, दोन पोलीस निरिक्षक आणि आणखी एका अधिकाऱ्यावर या महिला पोलिसांनी आरोप केले आहेत. तुम्हाला कमी काम लावतो, असे अमिष दाखवून महिलांचे शोषण केले. पोलिसांच्या सरकारी निवासस्थानी नेऊन या महिला पोलिसांवर अत्याचार केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची वरिष्ठ तपास यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी या महिला पोलिसांनी केली आहे. या पत्राची गंभीर दखल घेण्यात आली आहे आणि चौकशीही सुरु करण्यात आली आहे.
महिला पोलिसांनी टाकलेल्या या ‘लेटर बॉम्ब’मुळे पोलीस दलातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.