मुंबई: राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर असताना अचानकपणे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी मुंबई येथे जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री आजित पवार यांची भेट घेतल्याने मतदारसंघात राजकारणाला नवीन कलाटली मिळणार का? अशीच चर्चा सेलू मतदारसंघात नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात सुरू झाली आहे. एकेकाळीचे कट्टर विरोधक म्हणून राजकारणात सर्वत्र परिचित असणारे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये मनोमिलन झाले? अनेक वर्षांपासून दोघांमध्ये राजकीय हाडवैर असताना अचानक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रामप्रसाद बोर्डीकर यांनी अजित पवार यांची भेट का घेतली असावी? कोणती नवीन राजकीय खेळी खेळली जाणार? नेमके असे काय घडले की रामप्रसाद बोर्डीकर यांना अजित पवार यांची भेट घेण्याची वेळ आली. तसेच या भेटी दरम्यान काय चर्चा झाली असावी? असे अनेक प्रश्न मतदार संघातील मतदार, कार्यकर्ते यांना पडले आहेत.
ना. अजित पवार व बोर्डीकर यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या भेटीचे गुढ बाहेर आले. मुंबई बाजार समितीच्या अध्यक्षपदावरून अजित पवार व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यामध्ये राजकीय मतभेद निर्माण झाल्याने दोघांमध्ये राजकीय हाडवैराची ठिणगी पडली होती. त्यानंतर आजित पवार यांनी बोर्डीकर यांच्या मतदारसंघात जातीने लक्ष देऊन विजय भांबळे यांना राजकीय पाठिंबा देऊन ताकद, प्रतिष्ठा पणाला लावली.
बोर्डीकर यांचा पराभव करून विजय भांबळे यांना आमदार करून दाखविले. दोघांमधील राजकारणातील विरोधाचे अनेक किस्से असताना अचानक बोर्डीकर यांना काय साक्षात्कार झाला की त्यांना थेट अजित पवार यांची भेट घेण्याची वेळ आली? अशीच चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे अर्थ विभागाचा करभार असल्यामुळे कदाचित मतदारसंघाच्या विकास कामासाठी ते गेले असावेत, अशी सुध्दा चर्चा होत आहे. परंतु स्वतः आमदार असताना त्यांनी पवार यांची भेट घेणे टाळले, तर यावेळेस स्वतःहून अजित पवारांच्या भेटीला गेल्याने सेलू-जिंतूर विधानसभा मतदारसंघात उमेदवार व चिन्ह बदलणार का? अशीच चर्चा होत आहे