मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांना पुन्हा एकदा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हिंदुजा रुग्णालय त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापूर्वी देखील मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. परंतु, पुन्हा एकदा प्रकृती अस्वस्थामुळे बुधवारी त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.
मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असून ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अतिशय विश्वासू आणि जवळचे सहकारी मानले जायचे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक संविधानिक पदे भूषविली आहेत. मनोहर जोशी यांनी नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री ते केंद्रात मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.
मनोहर जोशी यांना याआधी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यावेळी जवळपास महिनाभर जोशी यांच्यावर उपचार केल्यानंतर रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. आता परत एकदा त्यांना रूग्णलयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही.