मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. लोकसभा निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्यानंतर, २६ जून रोजी विधानपरिषदेचे मतदान होणार आहेत. विधानपरिषदेच्या चार जागांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची नव्याने घोषणा करण्यात आली आहे. २ शिक्षक तर २ पदवीधर मतदार संघासाठी ही निवडणूक होणार आहे.
मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकांसाठी १० जून ही तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता विधानपरिषद निवडणुकांची तारीख बदलण्यात आली असून २६ जून ही तारीख जाहीर केली आहे.
दरम्यान, राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता, या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये, दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई पदवीधर मतदार संघातून संजय पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत ७ जुलै रोजी संपत आहे.
तर, मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपत आहे. त्यामुळे, येथील ४ जागांसाठी निवडणूक आयोगाकडून विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुका संपल्यानंतर लगेचच चारही विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान होणार होते. यापूर्वी मतदानाची तारीख दहा जून निश्चित झाली होती. मात्र, आता नवीन कार्यक्रमानुसार ह्या निवडणुकात २६ जून रोजी पार पडणार आहे. तर १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम
३१ मे ७ जून पर्यंत अर्ज भरणार
१० जून रोजी अर्जाची छाननी
१२ जूनपर्यंत अर्ज माघारी घेता येणार
२६ जून रोजी मतदान होणार
१ जुलै रोजी होणार मतमोजणी