मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. ‘ज्यांना जनतेने आणि शिवसैनिकांनी दीड-पावणेदोन वर्षांपूर्वी तडीपार केलं, तेच लोक आता ‘अब की बार तडीपार’चा नारा देत आहेत. हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्यांना जनताच त्यांची जागा दाखवेल’, असे ते म्हणाले.
शिवाजी पार्क मैदानात रविवारी (दि.१७) इंडिया आघाडीच्या नेत्यांची जाहीरसभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेवर निशाणा साधला होता. याला मुख्यमंत्र्यांनी सोमवारी (दि.१८) प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘राहुल गांधींनी हिंदूंचा अपमान केला आहे. जनता त्यांना जागा दाखवेल. ५० ते ६० वर्षांत काँग्रेसने जे केलं नाही ते मोदींनी मागच्या १० वर्षांत करुन दाखवलं. त्याचा प्रत्यय आपल्याला येतच आहे. देशाचा विकास आपल्यासमोर आहे. राज्यात दोन वर्षांत महायुतीने केलेलं काम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. राहुल गांधी यांचा ठाणे, मुंब्रा या ठिकाणी फ्लॉप शो झाला’, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळासमोर ही सभा झाली. तो काळा दिवस ठरला. कारण ज्यांनी वीर सावरकरांचा, हिंदू धर्माचा, सनातन धर्माचा अपमान केला अशा लोकांसह उद्धव ठाकरे बसले होते. उद्धव ठाकरेंनी त्याबद्दलही माफी मागितली पाहिजे. उद्धव ठाकरेंना भाषणासाठी पाचच मिनिटं वेळ देण्यात आली होती. यावरुन त्यांची इंडिया आघाडीत किती पत आहे ते दिसलं. राहुल गांधी बोलत असताना तिथे बसलेल्या लोकांच्या चेहऱ्यांवर नैराश्य दिसत होतं’.
हिंदू बांधवांनो-भगिनींनो म्हणायला जीभ कचरली का?
मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढे म्हटले की, ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो हे शब्द रविवारपासून बंद झाले. हिंदू बांधवांनो-भगिनींनो म्हणायला जीभ कचरली का? त्यांनी हे म्हणणं टाळलं. त्यावरुन पुन्हा लक्षात आलं की बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका, त्यांची विचारसरणी हे सगळं त्यांनी (उद्धव ठाकरे) सोडलं. त्यामुळे आम्हाला त्यांना सोडावं लागलं आणि मोठा निर्णय घेत बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा निर्णय घ्यावा लागला’.