मुंबई : मलाही गोरगरीब समाजाचं दुख आणि वेदना याची कल्पना आहे. म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करत आहे. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
५४ लाख नोंदी सापडलेल्या कुटुंबांना प्रमाणपत्र द्यावं, तसेच कुणबी प्रमाणपत्र नोंद सापडणाऱ्या कुटुंबाला सरसकट आरक्षण द्यावं आणि तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सग्यासोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्यावं अशा ३ मागण्या मनोज जरांगे पाटील यांच्या होत्या. त्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. या विजयानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवरायांसमोर घेतलेली शपथ पुर्ण केली, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आपली एकजुट आपण कायम ठेवली. अतिशय संयम आणि शिस्तीन आंदोलन पुर्ण केलं. कुठेही गालबोट न लावता हे आंदोलन यशस्वी केलं. कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली. मराठा समाजासाठी न्याय मागणाऱ्या मनोज जरांगे पाटील याचं कौतुक, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आपले सरकार घेणारे नाही तर देणारे सरकार आहे. मी दिलेला शब्द पाळला. शिवरायांसमोर घेतलेली शपथ पुर्ण केली, आम्ही दिलेला शब्द पाळतो, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.