मुंबई : राज्यातील पाचव्या टप्प्यासाठी उद्या सोमवार २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. या पाचव्या टप्प्यामध्ये मुंबईतील ६ आणि इतर ७ अशा १३ मतदारसंघासाठी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामध्ये ठाणे आणि कल्याण लोकसभेचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकांवर भाष्य करत आपल्या विजयाची गॅरंटीच दिली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीच्या सरकारने राज्यात विकास केला आहे. त्यामुळे मतदार विकासाच्या बाजूने मतदान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान मी राज्यभर प्रवास करत प्रचार केला. लोकांना विकास पाहिजे, मतदार विकासाच्या बाजूने मतदान करतील असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्य सरकारने अल्पसंख्यांकांसाठी खुप काम केल आहे. त्यामुळे यंदा अल्पसंख्याक मोठ्या संख्येने मतदान करतील. राज्यात जनतेला विकास हवा आहे. महायुतीच्या सरकारने आज सर्व क्षेत्राचा विकास केला आहे. त्यामुळे मतदारांचा कौल आमच्याच बाजूनी आहे, आम्हाला राज्यात ४५ पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वासही एकनाथ शिंदेंनी बोलताना व्यक्त केला आहे.
मतदान लोकशाहीचा हा पवित्र अधिकार आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. सर्वांना विकास हवा आहे आणि विकास करणारं, आमचं सरकार आहे. आमचा अजेंडा हा विकासाचा आहे. टोरेंट विद्युत कंपनीबाबत अनेक तक्रारी मला कळाल्या आहेत. आमचं सरकार सामान्य नागरिकांसोबत आहे. निवडणुका होताच टोरंट बाबत आम्ही बैठक घेऊन लोकांच्या हिताचा निर्णय घेऊ, असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.