Eknath Shinde Banner : मुंबई : राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या प्रचार एकनाथ शिंदेंच्या एका बॅनरवरून आता राज्याच्या राजकारणात नवा वाद सुरू झाला आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्यातरी, नवं वादळ राज्यात सुरू झालयं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी राजस्थान दौऱ्यावर गेले होते. यावेळी भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी लावलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘हिंदूहृदयसम्राट’ असा केला गेला. त्यामुळे ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका होत आहे.
भास्कर जाधव काय म्हटले
शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार भास्कर जाधव यांनीही मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे. “ही भाजपाची नामुष्की आहे. बाळासाहेब ठाकरेंनी हयात असताना नरेंद्र मोदींना ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला. पण, ते होऊ शकले नाही. एकनाथ शिंदे आणि बाळासाहेबांची तुलना करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे. तर, ही भाजपची वाईट अवस्था आहे. एकनाथ शिंदेंना भाजपाचा प्रचार करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. कारण, भाजपाच्या कुबड्यांवर ते मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे भाजपा सांगेल, ते एकनाथ शिंदेंना करावे लागेल,” असा टोलाही भास्कर जाधवांनी लगावला आहे.
संजय राऊत काय म्हटले
“हिंदूहृदयसम्राट आहोत की नाही हे एकनाथ शिंदे यांनी स्वतःच सांगितलं पाहिजे. कारण त्यांचा पक्ष म्हणजे जो काही गट त्यांनी स्थापन केला आहे तो गट आणि अजित पवार गट हे भविष्यात भाजपात विलीन होणार आहेत. कमळ चिन्हावर निवडणुका लढवतील. त्यांनी स्वतःला कितीही पदव्या बाहेर लावल्या तरीही महाराष्ट्रात अशा पदव्या लावायची यांची हिंमत नाही. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ तिथे असा पदव्या लावत आहेत. उद्या अमेरिकेत जो बायडेन यांच्या प्रचाराला गेले तर तिथेही असंच करतील. ” असा टोला राऊत यांनी लगावला.
यानंतर संजय राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे हे महान नेते आहेत. २०१४ नंतर भाजपाने असे अनेक नेते दुसऱ्या पक्षातून घेऊन निर्माण केले. पण हे सगळं तात्पुरतं आहे. एकनाथ शिंदे हे हिंदूहृदयसम्राट असतील तर त्यांनी असं काय महान कार्य केलं आहे ते पहावं लागेल आम्हाला. आम्ही इतके वर्षे सन्मानीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंसह काम केलं. त्यांचा संघर्षही पाहिला. त्यांनी कधी सत्तेसाठी तडजोडी केली नाही. आता गद्दारांना आणि बेईमान्यांना हिंदूहृदय सम्राट म्हणण्याची परंपरा नव्या हिंदुत्वात सुरु झाली असेल तर पहावं लागेल. भाजपानेच केलं आहे, राजस्थानच्या भाजपाला महाराष्ट्रात काय सुरु आहे काय माहीत आहे? एकनाथ शिंदे तिथे खोके घेऊन गेले असतील प्रचाराला.”
आदित्य ठाकरे आक्रमक
आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधलाय…बाप चोर, पक्ष चोर आणि आता हिंदूहृदयसम्राट म्हणजे आता निर्लज्जपणाचा कळस केलाय. किती मास्क लावून फिरणार त्यापेक्षा अॅक्टिंगचं काम तुम्हाला चांगलं जमतं…असा टोला आदित्य ठाकरेंनी शिंदेंना लगावलाय..
अजित पवार गटाचं प्रत्युत्तर
ठाकरे गटाच्या टीकेला अजित पवार गटानंही उत्तर दिलंय. हिंदूहृदयसम्राट म्हणून पोस्टर लागत असेल तर त्यात गैर काय? असा सवाल अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटलांनी केलाय. एकनाथ शिंदेंनी हिंदूंसाठी काम केलंय, म्हणूनच जनतेनं त्यांचे पोस्टर लावले आहेत असं अनिल पाटील यांनी म्हटलंय. तर शिंदे कधीही स्वत:ला हिंदुहदयसम्राट समजत नाही असं उत्तर शंभूराज देसाईंनी दिलंय.