ठाणे : नुकताच राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला असून त्यामध्ये महायुतीचा दणदणीत विजय झाला असून महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून आहे. अशातच भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा होऊ लागली असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले दोन दिवस झाले नाराज असल्याचे बोलले जात होते. याबाबत आज एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मौन सोडलं आहे. शिंदे म्हणाले, ‘आम्ही नाराज होऊन रडणारे नाही. आम्ही लढून काम करणारे आहोत. अडीच वर्षाच्या कार्यकाळावर मी समाधानी आहे’, असे सांगून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडत भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा केला आहे .
महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर राज्यात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर भाजप मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडण्यास तयार नसल्याने एकनाथ शिंदे प्रचंड नाराज असल्याचे बोलले जात होते. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून चार दिवस उलटून गेले तरी मुख्यमंत्रिपदावर निर्णय होत नसल्याने सेना-भाजप अशा दोन्ही पक्षांत नाराजी असलयाचे दिसू लागले होते. आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा, यासाठी सेना-भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आग्रही होते. परंतु भाजपकडून एकनाथ शिंदे यांना स्पष्ट निरोप देण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
‘मी मनमोकळा माणूस आहे. मी काहीही ताणून ठेवलेले नाही. मी मंगळवारी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला होता. सरकार बनविताना माझ्यामुळे अडचण आहे, असे तुम्हाला वाटू देऊ नका. तुम्ही आम्हाला खूप सहकार्य केले, त्यामुळे तुम्ही निर्णय घेऊ शकता. तुमचा निर्णय आम्हाला मान्य असणार आहे’. असे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अडीच वर्षात महायुतीच्या कामाला यश..
अडीच वर्षामध्ये महायुतीने केलेल्या कामाला यश आले असून त्यामुळे लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे. महाविकास आघाडीने थांबविलेली कामे आम्ही पुढे नेली आहेत. दुसरीकडे कल्याणकारी योजनांची आणि विकासाची आम्ही सांगड घातली. त्यामुळे लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला. आम्ही महायुतीच्या लोकांनी सगळ्यांनीच निवडणुकीत प्रचंड काम केले. पहाटेपर्यंत मी काम करायचो. दोन तीन तास झोपल्यानंतर पुन्हा सभा घ्यायचो. लोकांच्या भेटीगाठी सुरू होत्या. मी प्रचारात ८० ते १०० सभा घेतल्या. प्रवास केला. पायाला भिंगरी लावून काम केले. काल कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आज आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करेन. मुख्यमंत्री नव्हतोच मी कॉमन मॅन म्हणूनच काम केले.
अडीच वर्षाच्या कार्यकाळावर समाधानी : एकनाथ शिंदे
अमित शाह म्हणाले होते, चट्टान की तरह खडे रहेंगे. त्यांनी त्यांचा शब्द पाळला आहे. अडीच वर्षात खूप मोठी मदत आम्हाला दिली गेली. मोदी-शाहांना धन्यवाद देईन. आम्हाला पाठबळ दिले. अडीच वर्षाच्या काळात राज्याच्या प्रगतीचा वेग वाढला असून अडीच वर्षाच्या कार्यकाळावर समाधानी आहे. आम्ही नाराज होऊन रडणारे नाही. आम्ही लढून काम करणारे आहोत. एवढा मोठा विजय मिळाला, त्याची ऐतिहासिक अशी गणना होते. माझ्या शरीरात शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत जनतेची सेवा करेन. मला काय मिळाले त्यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळाले, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.