मुंबई: शिवसेना पक्ष कुणाचा? याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी निर्णय दिला. यासोबतच उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटाचे आमदार पात्र असल्याचा निर्णय नार्वेकर यांनी दिला. या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यानुसार ठिकठिकाणी अभिनंदनाचे बॅनर लागले आहेत. उद्धव ठाकरे कुटुंबाचं मातोश्री हे निवासस्थान मुंबईतील वांद्रे भागात आहे. उद्धव ठाकरे यांचा चांगलाच होल्ड या भागात आहे. आता या वांद्र्यात एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागलेत. बोरीवलीतही असेच बॅनर लागले आहेत.
या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘शिवसेना पक्षप्रमुख’ असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या विभाग प्रमुखांना असे बॅनर लावण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. यानंतरच्या सर्व बनर्सवर एकनाथ शिंदे यांचा ‘शिवसेना पक्ष प्रमुख’ असा उल्लेख करा, असे आदेश पक्ष कार्यालयातून देण्यात आले आहेत, अशी माहिती आहे.
एकनाथ शिंदे यांचा मोठा विजय… ‘एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना’ एकनाथ शिंदे साहेब हेच खरे वारसदार. अंतिम विजय हा बाळासाहेबांच्या विचारांचा… खऱ्या शिवसेनेचा…!, असा या बॅनरवर मजकूर लिहलेला आहे. हा बॅनर कुणाल सरमळकर यांनी लावला आहे. तर दुसऱ्या बॅनरवर शिवसेना पक्षप्रमुख आणि सामान्य जनतेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला कायमस्वरूपी मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन, असं म्हणण्यात आलं आहे. बंटी महाडिक यांच्याकडून सदर बॅनर लावण्यात आला आहे.