मुंबई : राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपात प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त निश्चित होणार असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ खडसे हे भाजपसोबत आल्यास उत्तर महाराष्ट्रातल्या जागांवर भाजपला उमेदवारांना निवडून आणण्यास मोठी मदत होईल. विशेष म्हणजे शनिवारी रात्रीच ते प्रवेश करतील, असं एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यातील तसेच केंद्रीय नेतृत्वातील नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी विनंती करत असल्याची एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत बातचीत केल्यानंतर एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीला रामराम करत भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकनाथ खडसे हे २०१४ मध्ये मुख्यमंत्री पदासाठी इच्छूक होते. मात्र, पक्षाने त्यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद दिलं. त्यामुळे नाराज असलेले खडसे विरुद्ध फडणवीस, असा संघर्ष सुरु झाला. काही दिवसानंतर खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खडसेंना अपेक्षेप्रमाणे फारकाही मिळालं नाही. अशातच आता ते पुन्हा स्वगृही परतणार असून शनिवारी रात्रीच त्यांचा प्रवेश होईल, असं वृत्त एबीपी माझा या मराठी वृत्त वाहिनीने दिलं आहे.
एकनाथ खडसे हे सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधानपरिषद सदस्य आहेत. तर त्यांच्या कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे आता रोहिणी खडसेंच्या पदाबद्दल शरद पवार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.