मुंबई : राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या आठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाने सोमवारी याबाबतचे आदेश जारी केले. गृह मंत्रालयाने केलेल्या बदल्यांमध्ये मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन यांची राज्य राखीव पोलीस बलाच्या उपमहानिरीक्षकपदी बदली करण्यात आली असून जैन यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागी सशस्त्र पोलीस बलाचे अप्पर पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर परिमंडळ सहाचे उपायुक्त हेमराज राजपूत आणि बंदर परिमंडळाचे उपायुक्त संजय लाटकर यांची महाराष्ट्र सायबरच्या अधीक्षक पदी नेमणूक करण्यात आली आहे.
मध्य मुंबईतील परिमंडळ चारचे उपायुक्त प्रशांत कदम यांची अनुसूचित जाती-जमाती आयोग मुंबई येथे अधीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे. राज्य गुप्तवार्ता विभाग नागपूर येथील उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांची पुणे शहर पोलीस दलात उपायुक्तपदी, ठाणे शहरचे उपायुक्त शिवराज पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे येथे अधीक्षकपदी आणि वाशीमचे अप्पर पोलीस अधीक्षक भरत तांगाडे यांची ठाण्यात अप्पर पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.