मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने नोटीस बजावली आहे. दरम्यान रोहित पवार यांना बुधवार 24 जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या आधी देखील केंद्रीय यंत्रणांकडून रोहित पवारांना वेगवेगळ्या प्रकरणात नोटीस बजावण्यात आली होती. तसेच नुकतचं त्यांच्या बारामती ॲग्रोशी संबंधित कारखान्यांवर ईडीचे छापे पडले होते. त्यानंतर आता रोहित पवार यांनी ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान मागील अनेक दिवसांपासून रोहित पवारांच्या घरी ईडीची छापेमारी सुरु होती. पण, त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले नव्हते. तसेच मी ज्याप्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करत असल्याने माझ्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाब आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं आमदार रोहित पवारांकडून वारंवार सांगण्यात येत होतं. त्यामुळे आता या सर्व घडामोडींवर रोहित पवार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच यानंतर रोहित पवार चौकशीला हजर राहणार? हे पाहणं देखील महत्वाचे ठरेल.
बारामती ॲग्रोवर ईडीची छापेमारी
बारमती ॲग्रो कथित गैरव्यावहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. बारामती ॲग्रोच्या सहा कार्यालयावर ईडीकडून तपास करण्यात आला. मागील वर्षी याच संदर्भात रोहित पवारांना नोटीस बजावण्यात आली होती. आता त्यांच्या कंपनीवर छापेमारी करण्यात आली आहे.
रोहित पवारांना याआधी देखील नोटीस आली होती: शरद पवार
दरम्यान रोहित पवारांना ईडीची नोटीस बजावल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आमदार रोहित पवार यांना आधी देखील नोटीस आली होती, असं म्हणत शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली.