मुंबई : महाराष्ट्रात सध्या ईडीच्या कारवाईची मोहीम सुसाट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यापाठोपाठ आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही मोठा धक्का बसला आहे. आता राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने संदीप राऊत यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. या समन्सनुसार संदीप राऊतांना पुढच्या आठवड्यात चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याआधी कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना अटक झाली आहे. त्यांच्या चौकशीनंतर आता संदीप राऊत यांना ईडीने समन्स पाठवले आहे. विशेष म्हणजे संदीप राऊत यांची याआधी मुंबई गुन्हे शाखेकडून देखील चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर आता ईडीकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे.