मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. आमदार रोहित पवार यांचा बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे. यामध्ये एकूण 161 एकर जमीन ईडीने जप्त केली असून जपवळपास 50.20 कोटी रुपयांची ही मालमत्ता असल्याची माहिती मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी रोहित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या कारवाईनंतर रोहित पवार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का? पण भाजपाने लक्षात ठेवावं….. झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू, माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत. या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई. परंतु मी महादेवाचा भक्त आहे. अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेव्हा अनेकांचं थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही, असही रोहित पवार म्हणाले आहेत.
माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का?????
पण भाजपाने लक्षात ठेवावं…. झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू!
माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न…— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 8, 2024