नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला जनतेकडून देणग्या स्वीकारण्याची परवानगी गुरुवारी निवडणूक आयोगाने दिली. त्यामुळे या पक्षाला जनतेकडून देणग्या स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (शरदचंद्र पवार) निवडणूक आयोगाने लोकांकडून व खासगी कंपन्यांकडून देणग्या स्वीकारण्याची परवानगी दिली होती. निवडणूक आयोगाने गुरुवारी एक पत्र प्रसिद्ध करत निवडणूक प्राधिकरण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदीनुसार सरकारी कंपनीशिवाय कोणत्याही व्यक्तीकडून किंवा कंपन्यांकडून ऐच्छिकरीत्या दिला गेलेला निधी स्वीकारण्याची परवानी देत असल्याचे सांगितले.
जनतेकडून ऐच्छिक योगदान स्वीकारण्यासाठी पक्षाची स्थिती नोंदवणारे प्रमाणपत्र देण्याची विनंती या पक्षाने आयोगाकडे केली होती. यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महासचिव सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एका प्रतिनिधी मंडळाने गुरुवारी आयोगाची भेट घेतली. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर गत वर्षी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयोगाने शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देत धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केले होते.