मुंबई : राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली. या दोघांमध्य झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. परंतु, या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. राज्यसभेच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना चव्हाण यांचा राजीनामा मोठी उलथापालत घडवून आणणारा दिसून येत आहे. चव्हाण यांना राज्यसभेवर जाण्याची संधी दिली जाणार का, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अशोक चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. चव्हाण लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. याबाबत अशोक चव्हाण यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राहुल नार्वेकर यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी नार्वेकरांना भेटलो, असे अशोक चव्हाणांकडून सांगण्यात आले.
मात्र, काँग्रेसचे काही नेते आमच्या संपर्कात असून ते आमच्याबरोबर येण्यास तयार असल्याचे भाजपचे नेते सांगत आहेत. काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे देखील संपर्कात असल्याचे अनेकदा भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत होते. नांदेडचे भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी दोन दिवसांपूर्वी अशोक चव्हाण भाजपमध्ये येतील असा दावा केला होता. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असा जाणकारांचाही होरा आहे. भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. नांदेडच्या राजकीय वर्तुळातही अशोक चव्हाण मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ‘भावी खासदार’ असा उल्लेख करत अशोक चव्हाणांचे स्टेटस देखील ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीची जोरदार चर्चा होत आहे.
दरम्यान, राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतरही अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात सरकारने निधी दिला होता. याशिवाय, बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याचा विचार करत होते, अशी चर्चा होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर बहुमत चाचणीवेळी मविआचे काही आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. भाजपला मदत करण्याासाठीच या आमदारांनी बहुमत चाचणीला येणे टाळल्याची चर्चा होती. यामध्ये अशोक चव्हाण यांचा समावेश होता. या घडामोडींमुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील, ही अटकळ अखेर खरी ठरताना दिसत आहे.
काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. तर मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यास काँग्रेस पक्ष आणखी कमकुवत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापूर दौऱ्यावर अशोक चव्हाण यांच्याबाबत थेट भूमिकाच जाहीर केल्यामुळे पुढे काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.