मुंबई : मुंबईत झालेल्या पहिल्याच मोठ्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. कारण मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन पावसामुळे विस्कळीत झाली. मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रशासनाने अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्याचा नि्र्णय घेतला आहे. यामध्ये सीएसएमटी- पुणे सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.
#ALERT FOLLOWING TRAINS ARE CANCELLED.@Central_Railway @YatriRailways pic.twitter.com/WWEkzLo7Dm
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) July 8, 2024
गेल्या काही तासांमध्ये मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळपासूनच मुंबईची लाईफलाईन असणारी रेल्वे सेवा कोलमडून पडली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात धो-धो पाऊस कोसळताना दिसत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, सातारा, सांगली या भागात दमदार पाऊस पाहायला मिळत आहे.
पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, कोकण, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस झाला. रविवारी पहाटेपासूनच मुंबईत पावसाला सुरूवात झाली. शहरातील अनेक भागात पावसाची संततधार सुरू असून, पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई लोकल रेल्वे सेवेवरही परिणाम झाला.