नागोठणे : दारूच्या नशेत ट्रक चालकाने पोलिसांच्या वाहनाला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात सहायक पोलिस निरीक्षकांसह पोलिस कार चालक जखमी झाले आहते. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी (दि.03) पहाटेच्या सुमारास नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील मुंबई गोवा महामार्गावरील सुकेळी हद्दीत जिंदाल कंपनीजवळ घडली आहे. सहायक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी आणि कार चालक मिलिंद महाडीक असे जखमींची नावे आहेत.
पोलिसांनी दीलेल्या माहितीनुसार, नागोठणे सहा पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी हे चालक मिलिंद महाडीक यांच्यासह बोलेरो पोलिस जीप क्रं. MH-06/CD4897 या शासकीय वाहनाने विभागीय गस्त घालत होते. त्यावेळी कोलाड पोलीस ठाणे येथे भेट देवुन पहाटेच्या सुमारास नागोठणे येथे परतत होते. यावेळी मुंबई-गोवा महामार्गावरील मौजे सुकेळी गावचे हद्दीत जिंदाल कंपनी समोर ट्रक क्रमांक MH-46/AF-8792 हा पलटी झालेला होता. त्या ठिकाणी कुलकर्णी यांनी आपली शासकीय वाहन उभे करून मदतीकरीता रस्त्याच्या बाजूला उभे होते.
याचवेळी दारूच्या नशेत असलेल्या ट्रक चालक सुभाष त्रिजुगी यादवने भरधाव वेगात हयगयीने, बेदरकारपणे गाडी चालवून उभी असलेली शासकीय पोलीस जिपला समोरुन जोरदार धडक दिली. या अपघातात सहा पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी व चालक पोलिस शिपाई मिलिंद महाडीक हे दोघेही जखमी झाले.
त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथोमोपचार करून पुढील उपचारासाठी पेण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून याची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास प्रभारी अधिकारी यांचे आदेशाने पीएसआय संजय चव्हाण करीत आहेत.