ठाणे : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली असून सभांचा धडाका सुरु केला आहे. प्रत्येक सभेमध्ये नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिकमधील सभेत बोलताना जातीपातीचं राजकारण कोण करतंय, असा सवाल उपस्थित करत शरद पवार यांना लक्ष केलं. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्यामुळेच राष्ट्रवादी फुटली, असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला होता.
आता याच आरोपाला जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार पलटवार केला आहे. आव्हाड म्हणाले, धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मी खूप काही बोलू शकतो, त्याला फक्त माझा एकच प्रश्न विचारा, बियानीचा मर्डर कोणी केला? त्याच्यामागचं कारण काय होतं. हिंमत आणि खऱ्या बापाचा पोरगा असेल तर याचं उत्तर देईल, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पुढे बोलताना म्हणाले, आमच्या एक भगिनी आहेत करुणा मुंडे नावाच्या, त्यांना बाजूला मी घेऊन बसतो आणि त्यांना सांगायला लावतो. जो खुद सिशोके घरो मे रहते हे, ओ दुसरो के घरो पे पत्थर नही मारा करते, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांना इशाराच दिला आहे. एकदा शरद पवार साहेबांनी सांगितलं ना की, तुझी किती लफडी होती आणि कसं बाहेर काढलं टीव्हीसमोर बसून सांगितलेलं आहे.
जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांच सर्वात जास्त नुकसान केलं, घर फोडलं म्हणता, मग हे शरद पवार साहेबांना जाऊन एकदा विचारा. साहेब जर असं सांगत असतील तर मी बोलतो हो, मी तसं केलं, धनंजय मुंडेने कशाला सांगायला हवं, हे एकदा शरद पवार साहेबांच्या तोंडून येऊ द्या ना, धनंजय मुंडे कोण? असापलटवार जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे.
हा अजित पावरांचाच भाऊ : जितेंद्र आव्हाड
पुढे बोलताना म्हणाले, हा अजित पावरांचाच भाऊ, काकांच्या पाठीत सुरा खुपसणारा, स्वतःच्या बहिणीला छळ छळ छळणारा, आता गोडवे गातायेत पूर्वी काय केलं ते मला विचारा मी सांगतो. मी फक्त एवढच सांगतो की माझं तोंड खूप घाणेरडं आहे, असंही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी म्हटले आहे.