मुंबई : राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वकीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी आणि व्यवसायाने डॉक्टर असलेल्या डॉ. गौरी पालवे (Dr. Gauri Palave suicide case) यांच्या आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. गौरी यांच्या मृत्यूबाबत गंभीर शंका व्यक्त करत त्यांच्या नातेवाईकांनी वरळी येथील सहायक पोलिस आयुक्त कार्यालयात लिखित तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत घटनेपूर्वी गौरी यांच्याशी संपर्कात असलेल्या तीन जणांकडून मानसिक छळ झाल्याचे म्हटले आहे.

तक्रारदार अशोक पालवे आणि अलकनंदा पालवे यांनी दिलेल्या निवेदनात अनंत गर्जे, अजय गर्जे आणि शितल आंधळे हे तीन जण गौरीच्या मृत्यूपूर्वी सतत संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सदर घटनेनंतर या तिघांनी आपापले मोबाईल बंद केल्याने संशय अधिक वाढला असून, त्यांची तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गौरी गर्जे यांच्या नातेवाईकांनी केली आहे.
आरोपी अजूनही मोकाट
तक्रारीनुसार, अजय गर्जे आणि शितल आंधळे यांच्याविरोधात आरोपपत्रात उल्लेख असूनही दोघांनाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आरोपी अजूनही मोकाट फिरत असल्याने तातडीच्या कारवाईची मागणी तक्रारदारांनी केली आहे.
दरम्यान, घटनेच्या दिवशी म्हणजे 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंतचे गौरी राहत असलेल्या इमारतीतील जिना, लिफ्ट आणि मुख्य प्रवेशद्वारावरील CCTV फुटेज जप्त करून त्याचा तपास करावा, अशी विशेष विनंती नातेवाईकांनी केली आहे.
या प्रकरणातील सर्व बाजूंनी तपास सुरू असून, पोलिसांकडून पुरावे आणि संपर्क नोंदींची पडताळणी केली जात आहे. दरम्यान, नातेवाईकांनी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.







