मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून आज (बुधवारी) चौथी यादी जाहिर करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील दोन जागांचा समावेश आहे. यात जालन्यातून काँग्रेसने डॉ. कल्याण काळे यांना, तर धुळ्यातून डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
अशी होणार लढत
धुळे : डॉ सुभाष भामरे विरुद्ध डॉ. शोभा बच्छाव
जालना : रावसाहेब दानवे विरुद्ध डॉ. कल्याण काळे
कोण आहेत डॉ. कल्याण काळे?
डॉ. कल्याण काळे हे छ. संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. आता जालना लोकसभा मतदारसंघातून ते भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दाणवे यांच्या विरोधात ते मैदानात उतरणार आहेत. जालना लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मनाला जातो. या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सलग ५ वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे डॉ. काळेंसाठी ही लढाई सोपी नसणार आहे.
कोण आहेत शोभा बच्छाव?
शोभा बच्छाव या काँग्रेसच्या नेत्या आहेत. शोभा बच्छाव यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. तसेच त्या नाशिकच्या माजी महापौर देखील होत्या.
जालण्यात सलग सात वेळा भाजपचा उमेदवार विजयी
जालना मतदारसंघात १९९६ पासून सात लोकसभा निवडणुका झाल्या. यामध्ये काँग्रेसचा सलग पराभव झाला असून भाजपचा उमेदवार तेथे निवडून आला आहे. यापैकी दोन निवडणुकांत भाजपच्या तिकिटावर उत्तमसिंग पवार, तर त्यानंतरच्या सलग पाच निवडणुकांत भाजपकडून रावसाहेब दानवे निवडून आले आहेत. भाजपने यंदाही रावसाहेब दानवे यांना उमेदावारी दिली आहे. २००९ मध्ये कल्याणराव काळे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवत रावसाहेब दानवे यांना तगडे आव्हान दिले होते.