मुंबई : डोंबिवली एमआयडीसीमध्ये काल गुरुवारी झालेल्या स्फोटामधील मृतांचा आकडा वाढला आहे. आज सकाळी बचावपथकाला आणखी तीन मृतदेह आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफचं पथक दुर्घटनास्थळी असून ढिगा-याखाली अडकलेल्यांचा शोध सुरु आहे.
डोंबिवलीतील अमुदान या केमिकल कंपनीत बॉईलरच्या स्फोटामुळे आग लागली. ही आग इतर कंपन्यामंध्ये देखील पसरली. या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं होतं. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अथक परिश्रमानंतर रात्री आग विझवण्यास अग्निशमन दलाला यश आले. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याचे काल समोर आलं होतं. पण आज बचावपथकाला आणखी तीन मृतदेह आढळले. बचावपथकाची शोधमोहिम सुरुच असून अजून काही कामगार मलब्याखाली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. मृतांचा आकडा वाढवण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एनडीआरएफच्या पथकांनी शुक्रवारी सकाळी शोधकार्याला सुरवाता केली तेव्हा अमुदान कंपनीच्या परिसरात ढिगा-याखालून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर शेजारील के.जी. कंपनीच्या आवारात आणखी एक मृतदेह मिळाला. तर स्फोटाने बेचिराख झालेल्या परिसरात भयावह दृश्य पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मृतदेहांचे अवशेष विखुरले आहेत. या ठिकाणी आणखी काही मृतदेह असण्याची शक्यता एनडीआरएफच्या पथकाकडून व्यक्त केली जात आहे.