ठाणे : ठाणे जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शाहपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी नऊ वर्षीय मुलाच्या जखमी पायाच्या जागी गुप्तांगावर शस्त्रक्रिया केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याप्रकरणी मुलाच्या पालकांनी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शस्त्रक्रियेतील गंभीर निष्काळजीपणाबाबत अल्पवयीन मुलाच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर आरोग्य अधिकाऱ्याने या प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन दिले आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत अधिक माहिती अशी कि, अल्पवयीन मुलगा त्याच्या मित्रांसोबत खेळत असताना त्याच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर उपचारासाठी त्याला 15 जून रोजी शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी जखमी पायाच्या जागी मुलाच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया केली.
मात्र, डॉक्टरांना त्यांची चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलाच्या जखमी पायावरही शस्त्रक्रिया केली. याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसला तरी या तक्रारीची चौकशी सुरू असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आरोग्य अधिकारी या आरोपांची चौकशी करणार असल्याचे जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.