मुंबई : मुंबईच्या ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३१ वर्षीय व्यक्तीने पत्नी एकटीच मॉर्निंग वॉकला जात असल्यामुळे तिला तलाक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, ठाणे पोलिसांनी एका ३१ वर्षीय व्यक्तीवर आपल्या पत्नीला कथितपणे तिहेरी तलाक देण्याचा गुन्हा दाखल केला आहे. तोंडी तलाक देण्यावर २०१९ मध्येच बंदी घातली होती. त्यानंतरही या व्यक्तीने या मार्गाचा अवलंब करत आपली संसारगाठ तोडण्याचा प्रयत्न केला.
आरोपी व्यक्ती मुंब्रा भागात राहतो. त्याने आपल्या २५ वर्षीय पत्नीच्या वडिलांना फोन करून आपण ट्रिपल तलाकच्या माध्यमातून घटस्फोट देत असल्याचे सांगितले. यासाठी त्याने आपली बायको एकट्यानेच मॉर्निंग वॉकला जात असल्याचे कारण दिले. तक्रारीनुसार आरोपीविरोधात बुधवारी भारतीय न्याय संहिता कलम ३५१ (४) गुन्हेगारी धमकी व मुस्लीम महिला (विवाह अधिकार संरक्षण) कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय घटनापीठाने २२ ऑगस्ट २०१७ रोजी ट्रिपल तलाक घटनाबाह्य असल्याचे घोषित केले होते. सुप्रीम कोर्टाने १४०० वर्ष जुनी परंपरा घटनाबाह्य घोषित करत सरकारला यासंबंधी कायदा तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार केंद्राने संसदेत एक कायदा पारित करून या कुप्रथेचा पायबंद केला होता. प्रस्तुत कायद्यानुसार, तीन तलाक देणे फौजदारी गुन्हा असून, त्यासाठी किमान ३ वर्षांच्या कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे.