मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला 2 लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशावरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज (दि. 29) माझगाव सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी धनंजय मुंडे यांचा करुणा शर्मासोबत झालेला विवाह हा अधिकृत नाही. मुंडे यांनी शर्मा यांच्याशी अधिकृत लग्न केलेच नाही, जर लग्न झालंच नाही तर मी पोटगी कशी देणार? असा प्रश्न मुंडेंच्या वकिलांनी विचारला. त्यावर कोर्टाने करुणा शर्मा त्यांना मूल आहेत. मग ही मूलं कोणाची आहेत, अशी विचारणा केली. मग करुणा मुंडे या मुलांची आई आहे की नाही? मग ह्यांचे वडील कोण? असे प्रश्न कोर्टाने यावेळी धनंजय मुंडेंच्या वकिलांना केले.
यानंतर करुणा शर्मा यांचे धनंजय मुंडे यांच्यासोबत लग्न झाले ज्याचे तुमच्याकडे पुरावे काय आहेत?, असा प्रश्न न्यायाधीशांकडून करुणा शर्मा यांच्या वकीलाला विचारण्यात आला. यावर हे सर्व पुरावे आम्ही सादर करू. आम्हाला वेळ हवा आहे, असे करुणा शर्माच्या वकीलांनी सांगितले. यानंतर पुढील तारखेपर्यंत पुरावे सादर करा, असे करुणा शर्मा यांना न्यायालयाने सांगितले. याप्रकरणी पुढील सुनावणी 5 एप्रिलला होणार आहे.