पुणे, ता. 18: आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा दांडी मारली आहे. त्यामुळे लवकरच ते राजीनामा देऊ शकतात अशी जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळातून सुरू झाली आहे.
माझ्यावर जेंव्हा सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला होता. त्यामुळे आता राजीनाम द्यायचा की नाही हे धनंजय मुंडे यांनीच ठरवावे असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. त्यातूनही त्यांनी सूचकपणे मंत्री मुंडे यांना एकप्रकारे इशाराच दिल्याचे समजले जात आहे. अजितदादांनी वक्तव्य केलं त्याच्या दोन-तीन दिवस आधीच मंत्री मुंडे यांनी त्यांची निवासस्थानी भेट घेतल्याचे समजत आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या केल्याप्रकरणी मुख्य सुत्रधार असलेला वाल्मिक कराड सध्या तुरूंगात आहे. वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जातो. तसेच त्याची आणि मंत्री मुंडे यांची व्यावसायिक भागिदारी असल्याचे पुरावे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अलिकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले होते. त्यानंतरच खरं तर मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी होऊ लागली. हेच कारण आहे की अलीकडेच पालकमंत्रीपदाचे वाटप झाले, तेव्हा धनंजय मुंडे यांना कुठलेही पालकमंत्रीपद दिले गेले नाही.
सत्ताधारी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण मागील बऱ्याच दिवसांपासून लावून धरले आहे, अलिकडेच त्यांनी आजारी असलेल्या मंत्री मुंडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर चर्चेंचा गदारोळ झाल्यानंतर त्यांनी तसे स्पष्टीकरणही दिले होते. दुसरीकडे मस्साजोग प्रकरणानंतर संघ आणि भाजपाच्या वरिष्ठही धनंजय मुंडे यांच्यावर नाराज असून दिल्ली निवडणुकीनंतर त्यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर मागील आठवड्यापासून मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे.