मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शेकापमधून आलेले रायगड जिल्ह्यातील धैर्यशील पाटील हे भाजपचे राज्यसभा उमेदवार असणार आहेत.
राज्यात राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्या राजीनाम्यामुळे दोन्ही जागा रिक्त झाल्या आहेत. भाजपने एका जागेवर आपला उमेदवार जाहीर केला आहे, तर दुसरी जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला दिल्याचे समजते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी वाईमध्ये झालेल्या राजकीय सभेमध्ये बोलताना साताऱ्याची जागा निवडून आणल्यास नितीन पाटील यांना खासदार करतो, असा शब्द दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वाटेला येत असलेल्या एका राज्यसभेच्या जागेवर नितीन पाटील यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.