पुणे प्राईम न्यूज: 2019 मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कल्पना ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीच आम्हाला सूचवली होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केला. फडणवीस यांच्या या खुलाशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शरद पवारांच्या भूमिकेव रप्रश्न उपस्थित केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. त्यात त्यांनी हा खुलासा केला. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कल्पना ही शरद पवार यांनीच भाजपला सूचवली होती. तेव्हा ठरल्याप्रमाणे ती लागू करण्यात आली.यावेळी शरद पवार आम्हाला म्हणाले होते की, मी एवढ्या लवकर युटर्न घेऊ शकत नाही. तुम्ही सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू करा. त्यानंतर मी संपूर्ण राज्याचा दौरा करून राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेईल. यानंतर आपल्याकडे पुरेसे संख्याबळ झाल्यानंतर महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस यांच्या घरी टाईप झाले होते राष्ट्रवादीचे लेटर
एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करताना सर्वच राजकीय पक्षांना पत्राद्वारे तुम्ही सरकार स्थापन करण्यास तयार आहात का? असा प्रश्न विचारला जातो. तसेच पत्र राष्ट्रवादीला देखील देण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी आपण सरकार स्थापन करणार नसल्याचे पत्र स्वतः मी लिहिले होते. ते माझ्याच घरी टाईप झाले होते. त्यावर शरद पवारांनी काही करेक्शन सूचवले होते. त्यांनी सांगितलेले करेक्शन दुरुस्त करून आम्ही राष्ट्रवादीच्या नकाराचे पत्र केंद्र सरकारला पाठवले. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागली होती, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
खासदार शरद पवार मोठे व्यक्ती आणि मोठे नेते आहेत. ते कायमच वेगवेगळ्या गोष्टी करतात. मात्र, शिवसेनेने आमचा विश्वासघात केला. त्यावेळी शरद पवारांनीच भाजपशी आघाडी करण्याची चर्चा केली होती. त्यांचीच भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची इच्छा होती. पण त्यानंतर जे काही घडले ते तुम्ही सर्वांनी पाहिले. हेच सत्य आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.