मुंबई : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस यांनी पहिला मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली आहे. पुण्यातील एका रुग्णासाठी पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे असं मदत देण्यात आलेल्या रुग्णाचे नाव आहे.
चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर तीनही नेत्यांनी मंत्रालयातील महापुरूषांच्या प्रतिमांना वंदन केले. शपथविधी झाल्यानंतर महायुती सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक मंत्रालयात झाली. दरम्यान, ७ डिसेंबर रोजी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन होणार असल्याचीही माहिती हाती लागली आहे. नवनिर्वाचित आमदारांना आमदारकीची शपथ देणे गरजेचे आहे. त्यासाठी कदाचित हे विशेष अधिवेशन घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.