मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. असे असताना आता मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जागावाटप आणि मित्रपक्षांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतील, असे सांगितले.
भाजपच्या मुंबई विभागाच्या कोअर कमिटीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे शेलार यांनी सांगितले. याबाबत आशिष शेलार म्हणाले, ‘मुंबईत कोअर कमिटीची (राज्य युनिटची) बैठक पार पडली. त्यामध्ये जागावाटप आणि विधानसभा मतदारसंघ निवडण्यासंबंधीचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत’. तसेच काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुव्यवस्थित करून अनावश्यक विलंब टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, या महत्त्वाच्या बैठकीत भाजपचे जिल्हास्तरावर विस्तारित कार्यकारिणीचे अधिवेशन घेण्यात येणार असून, त्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणुकीत कोणते मुद्दे असतील, त्यावर चर्चा, भाषणे आदी या अधिवेशनात होणार आहेत. भाजपकडून देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागावाटपाबाबत चर्चा करतील, असेही म्हटले आहे.
आगामी निवडणुकीत संभाव्य नुकसान टाळणार?
येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणूक होणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित असे यश मिळाले नाही. त्यामुळे आता भाजपकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आत्तापासून तयारी सुरु केली जात आहे. निवडणुकीची तयारी सुरळीत करून विलंबामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी या हालचालीचा उद्देश असल्याचे म्हटले आहे.