संतोष पवार
मुंबई : शाळांमधील शिक्षक संख्या निश्चित करण्यासाठी अर्थात संच मान्यतेसाठी विद्यार्थी संख्या व त्यांचे आधारकार्ड हा महत्वाचा निकष मानला जातो. विद्यार्थी संख्येवरच कार्यरत शिक्षकांची संख्या निश्चित केली जाते. तांत्रिक अडचणीमुळे आधार व्हॅलीडेशन राहिलेले विद्यार्थ्यांही संच मान्यतेसाठी गृहीत धरून संच मान्यता करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी निवेदनाद्वारे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शिक्षणमंत्री व ग्रामविकास विभाग यांच्याकडे केली आहे.
सन 2023-24 ची संभाव्य संचमान्यता जाहीर करताना ज्या विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलीड झालेले नाही. अशा विद्यार्थ्यांना संच मान्यतेमधून वगळून शिक्षक निश्चिती करण्यात आलेली आहे. ही बाब शिक्षकांवर व विद्यार्थ्यांवर अन्यायकारक ठरणार आहे. विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत शिकत असताना निव्वळ तांत्रिक अडचणीमुळे आधारकार्ड व्हॅलीड न झाल्याने संबंधीत शाळेतील शिक्षक पदे संभाव्य संच मान्यतेत कमी झाली आहेत.
वास्तविक आधार व्हॅलीड न होणे ही बाब पूर्णतः तांत्रिक अडचण आहे. कित्येक ठिकाणी आधार केंद्र उपलब्ध नाहीत. तरीही संबधीत शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक आधार व्हॅलीडसाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र किरकोळ बाबींमुळे केवळ आधार कार्ड मिसमॅच होत आहेत, म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे हे योग्य नाही. तरी तांत्रिक अडचणीमुळे आधार व्हॅलीड न झालेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करून सन 2023-24 ची संच मान्यता करताना त्यावेळची विद्यार्थी पटसंख्या लक्षात घेऊनच संच मान्यता करण्यात यावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.