मुंबई : येथे काल सोमवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठा तडाखा बसला. घाटकोपर येथे वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळले. यामुळे मोठा अपघात झाला. झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्य वाढली असून हा आकडा 14 वर गेला आहे. तर 75 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 1 व्यक्ती गंभीर जखमी आहे. बाकी 43 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 31 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बचावकार्य अजूनही सुरू आहे. आतापर्यंत 74 लोकांना वाचवण्यात यश आले आहे.
सोमवारी जोरदार पाऊस झाल्यामुळे अनेकांनी या पेट्रोल पंपावर आसरा घेतला होता. मात्र त्याचवेळी पंपालगत उभारलेला एक भलामोठा होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे थेट पेट्रोल पंपावर कोसळला. या होर्डिंगखाली तब्बल 80 वाहनं अडकल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर वेगाने बचावकार्य सुरू झाले. पेट्रोल पंप, सीएनजी पंप यामुळे हा संपूर्ण भाग ज्वलनशील असल्यामुळे इथे गॅस कटर वापरता येत नव्हता.
यावेळी राजवाडी रुग्णालयात 13 जणांचा मृत्यू आणि सायनन रुग्णालयात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली. जखमी झालेल्यांना घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत सरकारने जाहीर केलीय. तर जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार आहे. . बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं आहे.
या दुर्घटनेनंतर घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेट्रोल पंप मालक भावेश भिडे आणि जाहिरात कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 304, 338, 337, 34 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक तपास पंतनगर पोलीस करत आहे. मुंबई महानगरपालिका डिझास्टर अॅक्ट अंतर्गत संबंधित कंपनी आणि रेल्वे प्राधिकरणाविरोधात गुन्हा दाखल केला. ((120 बाय 120 फुटाचा हा बॅनर होता) राज्य सरकारच्या जागेत हा अनधिकृत बॅनर लावल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच्या आजुबाजूला तीन अजून मोठे अनाधिकृत होल्डिंग बॅनर आहे त्याच्यावर देखील पालिका कारवाई करत आहे.
घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली आहे. यावेळी घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांसाठी पाच लाख रूपयांच्या मदतीची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच या दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतल्या सर्वच होर्डिंग्जचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच अनधिकृत होर्डिंग्ज तातडीने हटवण्याचे आदेश दिलेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही घटनेची पाहणी करुन अपघाताची माहिती जाणून घेतली.