Crime News: मुंबई : बदलापूर (Badlapur) परिसरात महिलांची स्त्रीबीज काढून त्यांची बेकायदेशीर विक्री (Illegal sale of Female Sperm) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांनी आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना या प्रक्रियेसाठी तयार केले. संबंधित महिलांना कोणत्याही अधिकृत वैद्यकीय सल्ल्याशिवाय इंजेक्शन्स देण्यात येत होती. ही इंजेक्शन्स स्त्रीबीज वाढीसाठी वापरली जातात. आरोपींनी ही इंजेक्शन्स बेकायदेशीररित्या साठवून ठेवली होती आणि घरातूनच ही प्रक्रिया सुरू होती.
त्यानंतर संबंधित महिलांना आयव्हीएफ केंद्रात नेण्यात येत होते. तेथे शस्त्रक्रियेच्या माध्यमातून स्त्रीबीज काढण्यात येत होती. या स्त्रीबीजांची नंतर बेकायदेशीर विक्री केली जात असल्याचा आरोप आहे. या प्रक्रियेमुळे महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. तसेच महिलांचे आर्थिक आणि शारीरिक शोषण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाचा खुलासा बदलापूर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने केला. तपासादरम्यान आरोपींच्या मोबाईलमध्ये इंजेक्शन्सचे फोटो, वैद्यकीय अहवाल, तसेच आर्थिक व्यवहारांची माहिती आढळून आली. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली.
सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याची चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे महिलांनी अशा प्रकारच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.






