मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. इमारतीवरील दोन अवैध बांधकामावर कारवाई करु नये, यासाठी २ कोटी रुपयांची लाच मागून त्यापैकी ७५ लाख रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोघांना रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मंदार अशोक तारी (निर्देशित अधिकारी, के पूर्व विभाग, बृहन्मुंबई महापालिका, अंधेरी पूर्व), मोहम्मद शेहजादा मोहम्मद यासिन शहा (वय ३३, प्रॉपर्टी इस्टेट एजंट), प्रतिक विजय पिसे (वय ३५, कंत्राटदार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी यांची मुंबईतील शहीद भगतसिंग कॉलनीमध्ये स्वत:च्या मालकीची चार मजली इमारत आहे. या इमारतीवरील दोन मजले अवैध असून त्यांच्यावर कारवाई न करणे तसेच नियोजित प्लॉट क्रमांक १९३, १९४ खरेदी केल्यानंतर तेथील अनधिकृत बांधकामाबाबत सहकार्य करण्यासाठी सर्व मिळून २ कोटी रुपयांची लाचेची मागणी केली होती.
तक्रारदार यांनी ३१ जुलै रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार ६ ऑगस्ट रोजी त्याची पडताळणी केली असता मंदार तारी याने २ कोटी रुपयांपैकी पहिला हप्ता म्हणून ७५ लाख रुपये स्वीकारण्यास मान्य केले. त्याप्रमाणे सापळा रचून कारवाई करण्यात आली.
मंदार तारी यांच्या सांगण्यावरुन मोहम्मद शेहजादा मोहम्मद यासिन शहा व प्रतिक विजय पिसे हे पैसे घेण्यासाठी आले असता तक्रारदार यांच्याकडून ७५ लाख रुपये स्वीकारताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान, मंदार तारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपस पोलीस करत आहेत.