मुंबई : विधानसभा निवडणुकीत सकाळी अकरानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे कारण देत उमेदवारी अर्ज फेटाळणाऱ्या निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले. सुट्टीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांच्या खंडपीठाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० ऑक्टोबरला सकाळी ११ वाजताची डेडलाईन का? सकाळी ११ वाजल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे अर्ज नेमके कोणत्या आधारे फेटाळण्यात आले? असा सवाल उपस्थित करत निवडणूक आयोगाला तातडीने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.
वांद्रे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आकिफ अहमद दफेदार यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला. सकाळी ११ वाजल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे कारण देण्यात आल्याने अधिकाऱ्याच्या निर्णयाला आक्षेप घेत दफेदार यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. उच्च न्यायालयात केवळ सकाळी ११ वाजल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या कारणावरून निवडणूक आयोग अर्ज फेटाळू शकत नाही. कार्यालयीन वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारलेच पाहिजेत, असा दावा दफेदार यांच्या वकिलांनी केला, तर आयोगाच्या वतीने अॅड. अक्षय शिंदे यांनी याचिकेलाच आक्षेप घेतला.
याचिकाकर्त्या उमेदवाराने अर्जामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी तसेच आर्थिक तपशील दिला नाही, याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. खंडपीठाने याची गंभीर दखल घेतली. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ३० ऑक्टोवरची शेवटची तारीख होती. या दिवशी सकाळी ११ वाजल्यानंतर अर्ज दाखल केल्याच्या कारणावरून उमेदवारी फेटाळलेल्या राज्यभरातील उमेदवारांची यादी सादर करा, असा आदेशही खंडपीठाने दिला.