नवी मुंबई : पाम बीचवर भर दिवसा एका व्यावसायिकाला अडवून त्याच्याकडे तब्बल 2 कोटी रुपये उकळल्या प्रकरणी ठाणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नितीन विजयकर यांना त्याच्या साथीदारांसह अटक करण्यात आली आहे. पोलिसांनीच केलेल्या लूटमारीच्या या घटनेने मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना 29 मार्च रोजी घडली. पोलीस निरीक्षक नितीन विजयकर याच्या अटकेनंतर पोलीस दलातील लूटमारीला तोंड फुटले. घाटकोपरमधील विद्याविहार पाइपलाइन रोडवर राहत असलेले व्यावसायिक राजेश काटरा यांचे तुर्भे एमआयडीसीमध्ये एक कोल्ड स्टोअरेज आहे. शुक्रवारी काटरा हे कुटुंबातील सदस्यांना मुंबई विमानतळावर सोडून दुपारी नवी मुंबईच्या दिशेने निघाले होते. दोनच्या सुमारास त्यांची गाडी ही सायन-पनवेल मार्गावरील वाशी उड्डाणपुलावरून पामबीचवर जाण्यासाठी सर्व्हिस रोडवर आल्यानंतर लुटारूंनी त्यांची गाडी काटरा यांच्या गाडीला आडवी लावली. त्यांच्यागाडीच्या मागे देखील दुसरी गाडी लावली. तुमच्याकडे पैशांचा खूप मोठा साठा केला आहे. त्याबाबत आमच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. केस झाली तर तुमच्यासह पूर्ण कुटुंब यामध्ये अडकू शकते, अशी भीती दाखवत पोलीस निरीक्षक विजयकर व त्याच्या पाच साथीदारांनी राजेश यांना धमकावले. तसेच हे प्रकरण मिटवण्यासाठी दोन कोटी रुपयांची खंडणी काटरा यांच्याकडे मागितली.
या सर्व प्रकारामुळे भयभीत झालेले राजेश काटरा हे लुटारूंना वाशी येथील सेक्टर 29 मधील आपल्या नातेवाईकांच्या फ्लॅटवर घेऊन गेले. तिथे दोन कोटी रुपये या टोळीच्या हवाली केल्यावरच त्यांची सुटका झाली. पैसे घेऊन ही टोळी तिथून निघून जाताच राजेश काटरा यांनी थेट वाशी पोलीस ठाणे गाठले. त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानुसार गुन्हा दाखल करत पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे, पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी तीन पथक नेमून तपास सुरु केला. यामध्ये खबरी, तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे धक्कादायक तपशील हाती लागले. या खंडणी वसुलीमध्ये तोतया पोलीस नसून खरे पोलीस असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी नितीन विजयकर याला त्याचे साथीदार मोहन पाडळे, उदय कवळे, विलास मोहिते, नारायण सावंत आणि मोहन पवार यांच्यासह अटक केली. ही टोळी तर हाती लागलीच शिवाय अत्यंत गतीने तपास केल्याने त्यांनी लुटलेली पूर्ण रक्कमही मिळाली आहे.
पोलीस निरीक्षक विजयकर (वय -55) हा भांडुप पश्चिममध्ये प्रसाद अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याच्यावर पोलिसांनी दरोडा, अपहरण, धमकावणे आणि गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विजयकर याने अशा पद्धतीने आणखी कोणाची लुटमार केली आहे? याचाही पोलीस कसून तपास करीत आहेत