मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुरुवात झाली असून, परस्परांवरील आरोप-प्रत्यारोपांनी राज्यातील वातावरण ढवळून निघू लागले आहे. भारतीय जनता पक्षापाठोपाठ आता काँग्रेसनेही आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रमुख नेत्यांना मैदानात उतरवण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचार तोफा महाराष्ट्रात धडाडणार आहेत.
काँग्रेसकडून वरिष्ठ नेत्यांच्या झंझावाती प्रचारसभांचे आयोजन केले जात आहे. त्यानुसार खरगे हे पाच दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांच्या १३, १४, १६, १७ व १८ नोव्हेंबरला राज्यातील विविध भागांत जाहीर सभा होणार आहेत. राहुल गांधी १२, १४ व १६ नोव्हेंबर रोजी, तर प्रियंका गांधी १३, १६ व १७ नोव्हेंबरला काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभांना संबोधित करणार आहेत. त्याचबरोबर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांच्यासह काँग्रेसचे देशभरातील नेतेही राज्यात प्रचारासाठी उतरणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली.