मुंबई: दक्षिण मुंबईत मंत्रालयाशेजारी असणाऱ्या आकाशवाणी आमदार निवासातील काँग्रेस पक्षाचे आमदार विक्रम सावंत यांच्या खोलीचा पीओपी स्लॅब कोसळल्याची घटना रविवारी घडली. परंतु, सुदैवाने यावेळी खोली बंद असल्याने संभाव्य दुर्घटना टळली.
विक्रम सावंत हे सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. सावंत हे आकाशवाणी आमदार निवासातील खोली क्रमांक ४०१ मध्ये राहतात. या खोलीचा सकाळी पीओपी स्लॅब कोसळला. सुदैवाने खोलीत कोणीही उपस्थित नसल्याने दुर्घटना घडली नाही. रविवार असल्याने आमदार सावंत आणि त्यांचे स्विय सहाय्यक मतदारसंघात होते. त्यामुळे त्यांची रूम बंद होती. आकाशवाणी आमदार निवास ही ५० वर्षांहून अधिक जुनी इमारत आहे. तिची देखभाल-दुरुस्ती ही बांधकाम विभागाच्या खात्यांतर्गत येते.