मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. इच्छुक उमेदवारांची लगीनघाई सुरू आहे. त्यातच पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. धंगेकर यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत असतानाच, आता त्यांनी जाहीरपणे उमेदवारी मागितली आहे. माझा डीएनए छत्रपतींचा आहे. छत्रपतींनी स्वराज्य उभे केले, त्यांच्याच भागात मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे, उमेदवारी मिळाल्यास, संधीचे सोने करीन, असे रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट केले.
धंगेकर यांनी सांगितले की, माझ्या पक्षाकडे मी उमेदवारीची मागणी केली आहे. पक्षाने विश्वास ठेवल्यास मी तो नक्की सार्थ ठरवेन. सातत्याने नऊ वेळा मी निवडणूक लढलो असून, लोकांनी विश्वास ठेवला आहे. दरम्यान, पक्षाने अद्याप कोणत्याही प्रकारची तयारी करायला सांगितले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. धंगेकर यांनी या वेळी ड्रग्ज प्रकरणावरून तोफ डागली. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात संजीव ठाकूर यांना अटक झालेली नाही. तरुणाईला बिघडवण्याचे काम शासनस्तरावरून होत असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलीस प्रशासन काय करत आहे? अशी विचारणा करत, टेकडीवर नशेत सापडलेल्या आमच्या मुली होत्या, अशा वेळी आम्ही बघत बसायचे का,अशी विचारणा केली. पुण्यातील पब संस्कृतीला त्यांनी कडाडून विरोध दर्शवला.
काँग्रेसचे कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर २०२३ मध्ये कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव करत विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे जाहिरपणे सांगितले आहे.